bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04739
ग्राम पंचायत पायगाव

एक गाव, एक गणपती” ही पायगावची परंपरा केवळ उत्सवाची पद्धत नाही, तर ती गावाच्या सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घराघरातील भेद बाजूला राहतात आणि संपूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, महिला, युवक आणि विविध समाजघटक उत्सवामध्ये सहभागी होतात. आरतीपासून ते विविध कार्यक्रमांपर्यंत प्रत्येकाच्या सहभागातून सामूहिक आनंदाची अनुभूती मिळते. या परंपरेतून पुढच्या पिढीला एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा संस्कार मिळतो— उत्सव आपला असतो, पण त्याचा आनंद सर्वांसोबत वाटला तरच तो खऱ्या अर्थाने मोठा होतो. भक्ती, संस्कार आणि सांस्कृतिक वातावरण गणरायाच्या आगमनानंतर पायगावचे वातावरणच बदलून जाते. आरती, भजन, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे गावातील वातावरण भक्तिमय होते. या कार्यक्रमांमधून केवळ धार्मिक श्रद्धेला चालना मिळत नाही, तर चांगले विचार, संस्कार, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी यांचीही रुजवण होते. ज्येष्ठांकडून मिळणारे संस्कार आणि तरुणांचा उत्साह यांचा सुंदर मेळ गणेशोत्सवात पाहायला मिळतो. भक्तीसोबत पर्यावरणाची जाणीव पायगावच्या गणेशोत्सवात श्रद्धेबरोबरच पर्यावरणाची काळजी घेण्याची जाणीवही दिसून येते. विशेषतः गावातील शाडू मातीच्या गणेशमूर्तींची परंपरा ही या दृष्टिकोनाला अधिक अर्थपूर्ण बनवते. गावातील प्रसिद्ध मूर्तिकार आपल्या कौशल्याने शाडू मातीला आकार देतात आणि त्यातून देखण्या गणेशमूर्ती साकारतात. ही कला म्हणजे केवळ व्यवसाय नाही, तर पिढ्यान्पिढ्या जपलेली स्थानिक कलापरंपरा आहे. मातीपासून साकारलेला बाप्पा आणि त्याच मातीत परत विलीन होणारा गणराय — यातून निसर्गाशी असलेले आपले नातेही अधोरेखित होते. कालवारच्या मातीतून घडलेले कबड्डीचे खेळाडू पायगावचा अभिमान केवळ गणेशोत्सवापुरता नाही. कबड्डी हा गावाच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. गावातील युवकांनी कठोर परिश्रम, शिस्त आणि संघभावनेच्या जोरावर कबड्डीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रो कबड्डीमध्ये पायगावमधील खेळाडूंची निवड झाली आहे, ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब आहे. त्याचबरोबर राज्य कबड्डी संघातही कालवारच्या खेळाडूंनी स्थान मिळवले आहे.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4749 in a hash chain of 4,796. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash436c3d041d89c06aefdccd32bc8774edea96a996b124eb7d4e1dd46f30cfc8b9
Chain head9307074c23ee23091d7d06b6a7423c2014644d5ba5e2e38683ab06e10acfe4e4
The chain verifies end to end as of this page load.


