bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04533
एक परिवार एक गणपती
लाड परिवाराच्या गौरीचे खांदा कॉलनीत सोनपावलांनी आगमन; ७० वर्षांची परंपरा आजही कायम..* ‘एक परिवार, एक गणपती’च्या परंपरेचा चौथ्या पिढीकडून वारसा जतन; नववारी साडीतील बसलेली गौराई ठरते आकर्षणाचा केंद्रबिंदू.. ,खांदा कॉलनी येथे लाड परिवाराच्या गौरीचे पारंपरिक पद्धतीने सोनपावलांनी आगमन झाले. तब्बल ७० वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेली गौरी-गणपती उत्सवाची परंपरा लाड परिवाराने आजही जपली असून, सध्या चौथ्या पिढीकडून ही परंपरा पुढे नेली जात आहे. ‘एक परिवार, एक गणपती’ ही या कुटुंबाची विशेष ओळख आहे. लाड परिवाराकडे गौरी-गणपतीची स्थापना पाच दिवसांसाठी केली जाते. या उत्सवाच्या निमित्ताने परिवारातील सदस्य देश-विदेशात किंवा विविध ठिकाणी वास्तव्यास असले तरी सर्वजण खांदा कॉलनी, पनवेल येथे एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहात गौरी-गणपती उत्सव साजरा करतात. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक परंपरा न राहता कुटुंबातील स्नेह आणि एकोप्याचा सोहळाही ठरतो. गौरीच्या पूजेसाठी परिवारातील सर्व महिला पारंपरिक मराठमोळा पोशाख परिधान करून पूजा-अर्चना करतात. लाड परिवाराची बसलेली सुरेख गौराई विशेष आकर्षण ठरत आहे. गौरीला आकर्षक नववारी साडी नेसवून पारंपरिक दागिन्यांनी सजवण्यात येते. तिचे रूप इतके हुबेहूब आणि देखणे आहे की, शृंगार करून एखादी स्त्री प्रत्यक्ष समोर बसल्याचा भास होतो. त्यामुळे या वैशिष्ट्यपूर्ण गौरीच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिकही लाड परिवाराकडे आवर्जून भेट देतात. लाड परिवाराच्या गौरी उत्सवाला पूर्वी आणखी एक विशेष परंपरा होती. पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने सजवलेल्या पत्र्याचा मुखवटा असलेल्या गौरीची पनवेल शहरात मिरवणूक काढण्यात येत असे. कालांतराने ही मिरवणूक बंद करण्यात आली. मात्र गौरीच्या पूजेची आणि सजावटीची पारंपरिक पद्धत आजही कायम ठेवण्यात आली आहे. लाड परिवाराच्या गौरीच्या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. मूर्ती व्यवस्थित जतन करून पुढील वर्षी पुन्हा तिची स्थापना करण्यात येते. तर पारंपरिक तेरड्याच्या गौरीचे विसर्जन केले जाते. पाच दिवसांच्या उत्सवानंतर गौरी-गणपतीला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येतो. आधुनिकतेच्या काळातही तब्बल सत्तर वर्षाची कौटुंबिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत ती पुढील पिढीकडे सोपवण्याचे कार्य लाड परिवाराकडून सुरू आहे.
- Kind
- Tradition
- Place
- Raigad
- Art
- Adorning Dress and Body (Daśana-vasanāṅga-rāga) · Kala 40
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4543 in a hash chain of 4,597. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasheaafd24d2ab9c422ea7789888464ebb5c9b31a64e4ca4ca6c18f47273398ee79
Chain head241a8427bebdc68835d307c6102996e5ea86df3cde11079dc170355d9c538e03
The chain verifies end to end as of this page load.


