bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04458
शेळगीचा योगायोग गणपती

योगायोग तरुण मंडळ बहुउद्देशीय संस्था, शेळगी सोलापूर स्थापना : १९९७ “एक गणपती… एक विचार… एकजूट शेळगी!” सन १९९७… शेळगी परिसराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील एक अविस्मरणीय वर्ष! याच वर्षी काही उत्साही, समर्पित आणि समाजहिताची तळमळ असलेल्या तरुणांच्या पुढाकारातून “योगायोग तरुण मंडळ बहुउद्देशीय संस्था” या रोपट्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. श्रद्धा, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि युवकांची ऊर्जा यांचा सुंदर संगम घडवत मंडळाने आपल्या कार्याची सुरुवात केली. शेळगीतील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात सन १९९७ पासून शेळगी भागात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. श्री गणरायाची प्रतिष्ठापना ही केवळ धार्मिक परंपरा न राहता, ती संपूर्ण परिसराला एकत्र आणणारा आपुलकीचा आणि एकतेचा उत्सव बनली. जात-पात, धर्म, पक्ष, मतभेद आणि व्यक्तिगत भेद विसरून “आपला गणपती, आपला उत्सव” या भावनेने नागरिक एकत्र येऊ लागले. गणरायाच्या चरणी प्रत्येकाच्या श्रद्धेला स्थान मिळाले आणि शेळगीच्या सामाजिक एकतेला नवी ओळख मिळाली. “एक नगर – एक गणपती” : एकतेचा विचार १९९७ पासून “एक नगर – एक गणपती” ही संकल्पना मंडळाने जपली. एका गणरायाच्या चरणी संपूर्ण नगराने एकत्र यावे, प्रत्येक घरातील भक्ती एका मंडपात यावी आणि प्रत्येक मनामध्ये बंधुभावाची ज्योत प्रज्वलित व्हावी, हा या संकल्पनेमागचा विचार. ही केवळ एक संकल्पना नव्हती; ती होती एकजुटीची हाक… ती होती सामाजिक बांधिलकीची सुरुवात… आणि ती होती शेळगीच्या एकतेची ओळख! परंपरेचा ठेका… लेझीमचा नाद! गणेश स्थापना मिरवणुकीमध्ये पारंपरिक लेझीम खेळाचे सादरीकरण हे मंडळाचे खास वैशिष्ट्य ठरले. ढोल-ताशांचा निनाद, लेझीमच्या तालावर थिरकणारी पावले, भगव्या पताकांनी सजलेला मार्ग आणि “गणपती बाप्पा मोरया!”चा जय घोष या वातावरणात गणरायाचे आगमन म्हणजे प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा एक अविस्मरणीय सोहळा!
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- उत्तम मोरे
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4468 in a hash chain of 4,597. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash277fc029baf7fde1a3d78b54281d49f9c4901982f9cb5a7772df1b6014bbb34f
Chain head241a8427bebdc68835d307c6102996e5ea86df3cde11079dc170355d9c538e03
The chain verifies end to end as of this page load.


