bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03438
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे वसई-विरारमधील मंडळांचा कल

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे वसई-विरारमधील मंडळांचा कल गणेशोत्सव म्हटला की जल्लोष, ढोल-ताशे आणि रोषणाईचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, वसई-विरार शहरातील काही गणेशोत्सव मंडळांनी भक्ती आणि परंपरेसोबतच पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देत गणेशोत्सव साजरा करण्याचा आदर्श निर्माण केला आहे. गुलाल, डीजेपासून दूर राहत शांततेत उत्सव साजरा करण्यापासून ते पर्यावरणपूरक मूर्ती, निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती आणि डिजिटल पावतीपर्यंत विविध उपक्रम मंडळांकडून राबविले जात आहेत. वसईतील ‘वसईचा राजा’ मंडळ गेल्या ६९ वर्षांपासून गुलाल आणि डीजेचा वापर न करता अत्यंत शांततापूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करत आहे. या मंडळाची आणखी एक अनोखी परंपरा म्हणजे विसर्जनापूर्वी मूर्तीवरील रंग निघून जावेत यासाठी गणरायाला दूध आणि नारळाच्या पाण्याने अभिषेक केला जातो. पर्यावरणाची काळजी घेत निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जाते. तसेच वर्गणीसाठी डिजिटल पावतीचा वापर करून कागदाचा वापरही कमी करण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. नालासोपाऱ्यातील साईनाथ मित्र मंडळाने यंदा तब्बल २२ फूट उंच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती कागद आणि टिश्यूच्या साहाय्याने तयार करण्यात आली असून ती अवघ्या ४५ ते ५० मिनिटांत पाण्यात विरघळते, असा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे. मोठी मूर्ती असूनही विसर्जनाच्या वेळी पर्यावरणावर कमीत कमी परिणाम व्हावा, यासाठी मंडळाने हा पर्याय स्वीकारला आहे. वसईतील साईनगर गणेशोत्सव मित्रमंडळाने जलप्रदूषण रोखण्यासाठी वेगळा मार्ग स्वीकारला आहे. पूर्वी या मंडळाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरली जात होती. मात्र, मूर्तीला तडे गेल्यानंतर मंडळाने १४ फूट उंच फायबरची मूर्ती तयार करून घेतली. गेल्या तीन वर्षांपासून या मूर्तीचे विसर्जन न करता तिचीच पुनर्प्रतिष्ठापना केली जात आहे. त्यामुळे दरवर्षी नवीन मूर्ती तयार करण्याची आणि विसर्जनाची गरज कमी झाली आहे. वसई-विरार परिसरातील या मंडळांच्या उपक्रमांतून गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरूपाचे दर्शन घडत आहे. भक्ती, परंपरा आणि उत्साह कायम ठेवतानाच पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न आता अनेक मंडळांकडून केला जात आहे. त्यामुळे वसई-विरारमधील गणेशोत्सवाचा कल हळूहळू पर्यावरणपूरक उत्सवाकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
- Kind
- Story
- Place
- Palghar
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3448 in a hash chain of 3,454. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash676acbbb3903227f9e7b7b71babe05b665fbf329f4f6b73f47540bb6319e88f6
Chain head7a39d8a9933176f421c1706a3832df6b3b37171f4aa54116c7dd41795f789b03
The chain verifies end to end as of this page load.


