bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03379
समतेचा गणपती

*गणेशोत्सवातून समतेचा जागर… जाखडी कलेतून समाज प्रबोधन!* हेदली, ता. खेड, जि. रत्नागिरी हे निसर्गसंपन्न गाव असण्याबरोबरच कला, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि लोकजागृतीची परंपरा जपणारे गाव म्हणूनही ओळख निर्माण करीत आहे. गणेशोत्सव म्हटला की भक्ती, उत्साह, आनंद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आलीच. मात्र या उत्सवाला केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता, समाजप्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ बनविण्याचा सुंदर प्रयत्न हेदली गावात सातत्याने केला जात आहे. या उपक्रमात हेदली गावातील गोवळकर कुटुंबीयांचा विशेष सहभाग उल्लेखनीय आहे. कोकणच्या मातीत रुजलेल्या जाखडी या लोककलेच्या माध्यमातून गाणे, ताल, लय आणि शाहिरीच्या प्रभावी सादरीकरणातून सामाजिक संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य गोवळकर कुटुंबीयांकडून केले जाते. *जाखडीच्या तालावर सामाजिक परिवर्तनाचा जागर!* जाखडी ही केवळ करमणुकीची लोककला नाही, तर लोकांच्या मनापर्यंत पोहोचणारे प्रभावी प्रबोधनाचे माध्यम आहे. याच कलेचा सकारात्मक उपयोग करून गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य केले जाते. जात-पात आणि भेदभाव निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री-सन्मान, शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक एकोपा आणि संविधानिक मूल्ये अशा विविध विषयांवर गाण्यांच्या माध्यमातून प्रबोधनाचा जागर केला जातो. “ *विवेकाचा निर्मळ झरा, विघ्नहर्ता तू गौरीहरा, बहुजनांत ये येईल का? ज्ञानाचा दीप लावून सारा अंधार जाईल का ?* ” अशा अशा प्रबोधनाच्या अनेक गाणी जेव्हा जाखडीच्या तालावर गावकऱ्यांच्या कानावर पडतात, तेव्हा त्या केवळ ऐकल्या जात नाहीत; तर मनात विचारांची बीजे पेरतात. गोवळकर कुटुंबीयांची सांस्कृतिक बांधिलकी गावातील उत्सव हा समाजाला जोडणारा असतो. या भावनेतून गोवळकर कुटुंबीयांनी आपल्या कलेला सामाजिक जाणिवेची जोड दिली आहे. आपल्या पारंपरिक लोककलेचा वारसा पुढे नेताना, त्यातून समाजाला काहीतरी विधायक संदेश मिळावा, हा या प्रयत्ना मागचा सुंदर विचार आहे.परंपरा जपायची, पण विचारांना नवी दिशा द्यायची; कला जपायची, पण कलेतून समाजालाही घडवायचे. ही भूमिका आजच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. सचिन गोवळकर हेदली ता. खेड जि।रत्नागिरी
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Dance (Nṛtyam) · Kala 7
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3389 in a hash chain of 3,404. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashc9186d3a83549376eda460025d4c4ec8ede7928d4e689b837b7f9462c99cb429
Chain head58250108ebbe6f902894a59450c82ea48c1fab50111081c5c36b32c3cf92daeb
The chain verifies end to end as of this page load.


