bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02654
काजुटेकडीच्या राजाचा ६० वर्षांचा सुवर्णप्रवास

दरवर्षी भाद्रपदाच्या आगमनाची चाहूल लागते आणि आपल्या काजुटेकडीचा प्रत्येक कोपरा एका वेगळ्याच चैतन्याने न्हाऊन निघतो. पण यंदाचे वर्ष साधेसुधे नाही! आपल्या ‘काजुटेकडीचा राजा’ या लाडक्या बाप्पाचे हिरक महोत्सवी म्हणजेच ६० वे वर्ष. साठ वर्षांचा हा सुवर्णप्रवास म्हणजे केवळ एका उत्सवाची गोष्ट नाही तर ती काजुटेकडीतील प्रत्येक घराची, प्रत्येक पिढीची आणि भक्तीने एकत्र आलेल्या हजारो हृदयांची एक सुरस कहाणी आहे. आपला लाडका राजा आज ६० व्या हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना जुन्या आठवणींचे पट आपोआप उलगडू लागतात. १९६७ च्या काळात जेव्हा काजुटेकडीवर सुविधा अपुऱ्या होत्या तेव्हा आपल्याच पूर्वजांनी ज्येष्ठ नागरिकांनी हाताला हात लावून या उत्सवाची पायाभरणी केली. उत्सवाचे ते दिवस म्हणजे संपूर्ण काजुटेकडी हे एकच मोठे कुटुंब असायचे. बाप्पाच्या आरतीचा तो गोड आवाज, मंडपात एकत्र येऊन सजावट करताना रात्रीच्या रात्री जागवणारे कार्यकर्ते आणि महाप्रसादाच्या वेळी येणारा तो आपुलकीचा सुगंध! लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण राजाच्या सेवेत लीन असायचा. अनेकदा संकटे आली, आर्थिक अडचणी आल्या, पण "राजा पाठीशी आहे!" या एकाच विश्वासाने काजुटेकडी कधीच थांबली नाही. राजाच्या त्या सोज्वळ आणि भव्य मूर्तीकडे पाहिले की सगळ्या वर्षाचा थकवा पळून जायचा आणि डोळ्यांतून आनंदाश्रू वाहायचे. हाच तो अनुभव जो आज तीन पिढ्यांना एका धाग्यात बांधून ठेवत आहे. ६० वर्षांच्या कालावधीत काजुटेकडीच्या राजाने आपल्याला केवळ उत्सव साजरा करायला शिकवले नाही तर सामाजिक भान जपायला शिकवले. ६० वर्षांच्या या ऐतिहासिक प्रवासात मंडळाने अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण संवर्धक असे उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले. यात दरवर्षी आयोजित केले जाणारे आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत पुरवण्याचे कार्य, परिसरातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांचा गुणगौरव, स्थानिक कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी हळदी-कुंकू, आणि बाल गोपाळांसाठी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन, तसेच निसर्गाचे रक्षण व्हावे यासाठी वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान या आणि अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. आपल्याला या परंपरेचा अत्यंत अभिमान आहे. यंदाचा हा ‘हिरक महोत्सव’ अधिक भव्य, स्मरणीय आणि सेवाभावी करण्याचा सर्व कार्यकर्त्यांचा मानस आहे. हा अहवाल प्रत्येक घरात पोहोचवत असताना, आमची इच्छा आहे की या ६० व्या वर्षात परिसरातील प्रत्येक कुटुंबाने या आनंदाच्या सोहळ्यात आपले मानाचे स्थान स्वीकारावे. तसेच,ज्या ज्येष्ठांनी हा वृक्ष लावला, ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र घाम गाळला आणि ज्या दानशूर भक्तांनी आपल्या सढळ हाताने या मंडळाला पाठबळ दिले त्या सर्वांच्या चरणी हे मंडळ मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. काजुटेकडीच्या राजाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या घरावर, आरोग्यावर आणि आनंदावर असाच सदैव राहो, हीच राजाच्या चरणी प्रार्थना! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2664 in a hash chain of 3,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3285aebc3fbc70c7a5fc5f65ff78a90f9bbdd913458c4b2267f819ad099745d6
Chain head2e4ced2e5dc7599090ca0d1ba0be0e84b0094938910de8acc2f135939200253a
The chain verifies end to end as of this page load.


