bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02628
मोहित अनिल भुजाडले
माझ्या घरचा बाप्पा… आणि मुंबईच्या बाप्पाची सेवा गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻 आमच्या घरी 1५० हून अधिक वर्षांची गणपती आणि गौरीची परंपरा आहे. लहानपणापासून गणपतीची सजावट, गौरीची आरास, आरती, प्रसाद, अन्नदान आणि कुटुंबासोबतचा उत्साह—गणेशोत्सव म्हणजे आमच्यासाठी आनंदाची पर्वणी. पण गेली चार वर्षे गणेशोत्सवाच्या काळात मी माझ्या गावी जाऊ शकलो नाही. मी मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून कार्यरत असल्याने गणपती आगमनापासून शेवटच्या विसर्जनापर्यंत मुंबईतील गणेशोत्सवाच्या व्यवस्थेत कार्यरत असतो. विसर्जनाची व्यवस्था, सुरक्षितता, स्वच्छता आणि विविध विभागांशी समन्वय यासाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावावे लागते. तिकडे माझ्या गावात बाप्पा आणि गौरी विराजमान असतात… आणि मी त्यांचे दर्शन फोटो आणि व्हिडिओ कॉलवरून घेत असतो. आरतीचे सूर मोबाईलमधून ऐकताना मन गावच्या आठवणींमध्ये हरवून जाते. कधी मनात येतं—“यावर्षी तरी गावाला जावं…” पण मग जाणवतं— “माझ्या घरच्या एका बाप्पाजवळ मी नसतोय, पण मुंबईच्या लाखो बाप्पांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळतंय.” ही भावना केवळ माझी नाही. मुंबईच्या गणेशोत्सवासाठी स्वतःच्या घरापासून दूर राहून सेवा करणाऱ्या महानगरपालिका कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, अग्निशमन दल, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवक आणि प्रत्येक सेवकाची हीच कहाणी आहे. देवाची सेवा फक्त देवासमोर उभं राहून होत नाही; कधी कधी देवाच्या भक्तांची सेवा करण्यातही देव भेटतो. माझ्या गावचा बाप्पा मनात आहे… मुंबईचा बाप्पा कर्तव्यात आहे… आणि दोन्ही माझ्यासाठी तितकेच जवळचे आहेत. ❤️ गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🏻 ही कथा मुंबईच्या गणेशोत्सवासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रत्येक सेवकाला समर्पित. मुंबई महानगरपालिकेतर्फे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी करण्यात आलेल्या विविध व्यवस्थांमध्ये सहभागी होण्याचा मला मिळालेला अनुभव… 🙏🏻 या व्यवस्थेची एक छोटीशी झलक या व्हिडिओद्वारे आपल्यासोबत शेअर करत आहे. गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2638 in a hash chain of 3,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8e86d4f930a7777f6a9db3536d0b10de4727ced4948e4783353b3aa2f18d68d4
Chain head2e4ced2e5dc7599090ca0d1ba0be0e84b0094938910de8acc2f135939200253a
The chain verifies end to end as of this page load.


