bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02200
‘श्रीकृष्ण ते जगन्नाथ पुरी’ विषयावरील घरगुती गणेशोत्सवातील चलचित्र देखावा,

गणेशोत्सव म्हटला की, गणरायाची आकर्षक मूर्ती, मनोहारी सजावट आणि विविध देखावे यांची रेलचेल पाहायला मिळते. विरार पश्चिमेकडील नाळा गावातील म्हात्रे कुटुंबीयांच्या घरी यंदाही दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त आगळावेगळा चलचित्र देखावा साकारण्यात आला आहे. ‘श्रीकृष्ण ते जगन्नाथ पुरी’ या विषयावर आधारित धार्मिक आणि प्रबोधनात्मक देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.नाळा गावातील प्रशांत आणि मनीष म्हात्रे यांच्या घरी गेल्या पन्नास वर्षांपासून गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती गणेशोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक विषयांवर चलचित्र देखावे साकारत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. यंदा ‘विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्ण ते भगवान जगन्नाथ’ हा जीवनप्रवास दृकश्राव्य, एआय व्हिडिओ आणि चलचित्र माध्यमातून सादर करण्यात आला आहे. श्रीकृष्णाचा जन्म, त्यांचा जीवनप्रवास, गुजरातमधील भालका तीर्थ येथे पायाला बाण लागल्यानंतर झालेले वैकुंठगमन आणि त्यानंतर त्यांचे हृदय रुपी अंश जगन्नाथ पुरी येथे पोहोचल्याची धार्मिक आख्यायिका या देखाव्यात प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. जगन्नाथ पुरी येथील मुळ मंदिर, भगवान जगन्नाथांच्या मूर्तीशी संबंधित नवकलेवर विधी, मंदिरातील पुजारी, महाप्रसादाची परंपरा, महाप्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या चुली, बेडी हनुमान मंदिर, तसेच काळचक्र स्वरुपात आकाशवाणी होताना विजांचा कडकडाट डोळ्यांचे पारणे फिटेल अशा विविध प्रसंगांचे सादरीकरण दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कुटुंबातील अथर्व म्हात्रे, ईशानी म्हात्रे आणि ध्रुव म्हात्रे या भावंडांनी अवघ्या पंधरा दिवसांत हा चलचित्र देखावा साकारला आहे. सुमारे आठ मिनिटांच्या या देखाव्याला वसईतील सुप्रसिद्ध निवेदक राजेश राऊत यांनी आवाज दिला आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत भाविकांना हा देखावा पाहता येणार आहे.
- Kind
- Story
- Place
- Palghar
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2210 in a hash chain of 2,210. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash37210135be6794e3be44909721e8ba6edd638bc4286d9899c71ea90a694969c6
Chain head37210135be6794e3be44909721e8ba6edd638bc4286d9899c71ea90a694969c6
The chain verifies end to end as of this page load.


