bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02033
Navsala pawnara Bhrushundi Ganesha

नवसाला पावणारा भृशुंड गणेश :डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया: विदर्भातील अष्टविनायकात स्थान असलेल्या येथील भृशुंड गणेश जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवानिमित्त याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या शहरावर वसलेल्या भंडारा शहरात मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आहे. भंडा-याचा भृशुंड गणेश हा तेथील प्रतिमेच्या प्राचिनतेमुळे तसेच भव्यतेमुळे ग्रामवासी जनतेचे श्रध्दा स्थान आहे. भृशुंड गणेश मूर्तीत जणू ऋषींचा भास होतो. अखंड रक्ताश्म शीळेवर कोरलेली ही मूर्ती गाभा-यात तळापासून आठ फूट उंच व चार फूट रूंद आहे. पूर्ण सिंदूर चर्चित मूर्ती चतुर्भूज असून मूशकारूढ आहे. उजवा पाय खाली सोडलेला व डाव्या पायाची मांडी घातलेली मूर्ती आहे. चारही हातांमध्ये पाश, अंकूश, मोदक असून उजवा वरद हस्त आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. मुखमंडळाचे जागी नाकपुडया, डोळे, मिशा व दाढी दिसत असून चेहरा भव्य व स्पष्ट आहे. सोंड डाव्या हातावरील मोदकाकडे वळलेली आहे. भृशुंड गणेशाचं मंदीर हेमाडपंथी आहे. मूर्तीची स्थापना ११३० मध्ये झाली असावी असा अंदाज आहे. तसे मेंढा परिसरात गिरीवंशीय गोसावी लोकांच्या समाधी समूहाचा एक भाग आहे. आजही या भागात हेमाडपंथी शैलीतील स्मारके बघायला मिळतात. तसेच कित्येक वर्ष हे भृशुंड गणेशाचे मंदीर दुर्लक्षीत होते. परंतू भंडारा येथील ग्रामजोशी श्री विश्वासराव जोशी यांचे पुढाकाराने १९८६ पासून तिथे पूजा सुरू केली गेली. मंदीराची भव्यता वाढली असून सभामंडप भव्य व सुंदर परिसर गणेश भक्तांना आध्यात्मिक सुख देण्यात हातभार लावत आहे. भृशुंड गणेशमेंढा – परिसरातील ग्रामवासियांनी पुढाकाराने साकारलेली एक वस्तू असून त्यांच्याच सहकार्याने विविध कार्यक्रमांची रेलचेल वर्षभर असते. आज दर चतुर्थीला अभिषेक व महापूजा असते. गणेशोत्सवाचा दहा दिवस कार्यक्रम चालतो. आणि पौष संकष्ट चतुर्थी ते माघ चतुर्थी पर्यंत एक महिनाभर कार्यक्रम असतो. पूजापाठात ग्रामस्थ हिरिरीने सहभागी होवून कार्यक्रम व उत्सव थाटात पार पाडतात. संस्कारक्षम वातावरण निर्मीतीसाठी ग्रामीण महिलांना गणपती अथर्वशिर्ष शिकविण्यात आले. त्यामुळे आवर्तनाभिषेकात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. या देवस्थानाला आजवर अनेक संतमहंतांनी भेटी दिल्यात श्रृंगेरी पिठाचे जगद्गुरू शंकराचार्य प. पू. श्री भारतीतीर्थ हे एक होत. नुकतीच बडोद्याचे प. पू. श्री. जनार्दनस्वामी खेर यांनी सुध्दा भृशुंड गणेशाचे दर्शन घेतले. याच मंदीर परीसरात आहे भाविकांची मनोरथे पूर्ण करणा-या श्री. भृशुंड गणेशाची आरती त्याची महती गाणारीच आहे. आरती श्री गणेशा, देवा मंगळमूर्ती नामले रामस्वामी, वेद वर्णिती कीर्ती ॥१॥ भृशुंड ॠषीवर दे तुला प्रसन्न केले दिधले ते निज स्वरूपा अपूले ॥२॥ नादा: बिंदू सुधा न भी कर्पुरा देते तिन्हींचा संगम झाला, प्रभू नांदसी तेथे ॥३॥ कामना पूर्ण होती, तुझे दर्शने देवा गोसाची नंदन तुझे चरणी सेवा ॥४॥ आरती श्री गणेशा ॥ श्री भृशुंड ॠषींनी वैनगंगेच्या तीरावर वटवृक्षाखाली तपश्चर्या करून या क्षेत्राला पावन केले आहे. गणेश व मुदगल पुरांणांतून भृशुंड गणेशाचे आख्यान दिलेले आहे. अशा या पावन भृशुंड गणेश मंदीरातून प्रज्वलीत झालेली संस्काराची ज्योत समाजाच्या तळागळापर्यंत जावून सामाजिक एकात्मतेची बंधूभावाची एक अखंड महाज्योत व्हावी अशी प्रार्थना श्री भृशुंड गणेशाचे चरणी करूया. डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया
- Kind
- Story
- Place
- Gondia
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2043 in a hash chain of 2,050. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash4f3271dc6a7d5146735808079b56050363f3fe984446c98db0fbaf0435d3bd09
Chain headc17111c7cb3f31344e72c07df97f5592ff6faf687d8bb02aca292e2af4cbfd7f
The chain verifies end to end as of this page load.


