bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01833
माती पासून घडलेला बाप्पा
मातीपासून घडलेला बाप्पा एक साधं घर… साधी परिस्थिती… पण त्या घरात राहणाऱ्या एका माणसाच्या हातात एक विलक्षण कला होती. त्या माणसाचं नाव होतं नागनाथ आमसिद्ध बंडगर. मी जन्माला येण्यापूर्वीपासूनच माझे वडील चिखलापासून गणपतीच्या सुंदर मूर्ती तयार करून विकत असत. गणपतीची मूर्ती पाहिली की तिचं बारकाईने निरीक्षण करून, अगदी हुबेहूब मूर्ती चिखलातून घडवण्याची कला त्यांच्या हातात होती. सुरुवातीला मात्र आमच्या घरी गणपती बसवला जात नव्हता. दिवसभर इतरांसाठी गणपती घडवताना त्यांच्या हाताला माती लागायची; पण हळूहळू त्या मातीमध्ये त्यांना काहीतरी वेगळंच जाणवू लागलं. गणपतीची मूर्ती घडवताना त्यांच्या मनात भक्तीची भावना निर्माण होऊ लागली. हळूहळू गणपतीबद्दलची श्रद्धा, निष्ठा आणि प्रेम त्यांच्या मनात वाढत गेलं. आणि मग आला तो खास दिवस… सन १९८८. माझ्या वडिलांनी ठरवलं— “आपण इतरांच्या घरी बाप्पा पाठवतो, मग आपल्या घरात बाप्पाला का आणू नये?” त्या वर्षी पहिल्यांदा आमच्या घरात गणपतीची स्थापना झाली. तो केवळ गणपती बसवण्याचा दिवस नव्हता; तो आमच्या घरच्या एका नवीन परंपरेचा जन्म होता. ज्या हातांनी वर्षानुवर्षे इतरांसाठी गणपती घडवले, त्याच हातांनी आपल्या घरच्या बाप्पाची सेवा केली. काळ पुढे गेला… वर्षे बदलली… पण १९८८ मध्ये सुरू झालेली ही परंपरा मनात कायम राहिली. आज माझे वडील आमच्यासोबत प्रत्यक्ष नाहीत. पण गणपतीची मूर्ती दिसली की त्यांच्या हातांची आठवण येते. मातीचा सुगंध आला की त्यांची आठवण येते. आणि घरात बाप्पाची स्थापना झाली की मनात एकच भावना येते— “बाबांनी मातीपासून बाप्पा घडवला, पण त्या बाप्पाने बाबांच्या मनात श्रद्धा घडवली.” म्हणून आमच्यासाठी हा गणपती फक्त उत्सव नाही. हा आमच्या वडिलांचा वारसा आहे… त्यांच्या कलेची आठवण आहे… आणि त्यांच्या श्रद्धेची जिवंत खूण आहे. आजही बाप्पा घरी येतो तेव्हा असं वाटतं… बाप्पाच्या रूपाने बाबा पुन्हा एकदा आमच्या घरात आले आहेत.
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1843 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9cfd5c53930275d3877d9b692701eeea68ce81a031e063b271e8f820b285fc53
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


