bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01542
माझ्या कुटुंबातील गणेशोत्सवाची परंपरा

आमच्या कुटुंबामध्ये भाद्रपद महिन्यात श्री गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. ही परंपरा नेमकी कोणत्या वर्षी सुरू झाली, याची निश्चित लिखित नोंद आज उपलब्ध नाही. मात्र, कुटुंबातील ज्येष्ठांकडून मिळालेल्या आठवणी आणि मौखिक परंपरेनुसार, आमच्या पंजोबांच्या आधीपासूनच घरामध्ये गणपतीची स्थापना केली जात होती. त्यामुळे ही परंपरा अंदाजे १०० ते १२५ वर्षांहून अधिक जुनी असण्याची शक्यता आहे. पूर्वी आमचे कुटुंब जुन्या घरामध्ये एकत्र राहत असे. त्याच घरात श्री गणेशाची स्थापना करून संपूर्ण कुटुंब भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करत असे. त्या काळातील गणेशोत्सव साधेपणाने होत असे; मात्र त्यामागील श्रद्धा आणि आनंद आजच्या काळाइतकाच मनापासून होता. माझ्या वडिलांच्या आठवणी सांगताना एक गोष्ट विशेष लक्षात राहते— त्यांनी एक रुपयाचा गणपतीसुद्धा आणला होता. आजच्या काळात ही रक्कम छोटी वाटू शकते, पण त्या वेळच्या परिस्थितीत त्या एका रुपयामागे असलेली भक्ती आणि गणरायाबद्दलची भावना अधिक महत्त्वाची होती. अशा छोट्या-छोट्या आठवणींमधून आमच्या कुटुंबातील गणेशोत्सवाचा साधेपणा आणि श्रद्धा जाणवते. काळ बदलला, कुटुंबाची परिस्थिती बदलली, एका घराची दोन घरे झाली. माझ्या कुटुंबाने नवीन घर बांधले . जुन्या घराप्रमाणेच नवीन घरात ही गणेशोत्सवाची परंपरा मात्र कायम राहिली. गेल्या सुमारे १५ वर्षांपासून मी आणि माझा भाऊ नवीन घरामध्ये श्री गणेशाची स्थापना करून हा उत्सव पुढे चालवत आहोत. दरवर्षी गणरायाची स्थापना करताना आम्हाला केवळ एक उत्सव साजरा केल्याची भावना नसते; तर आमच्या पूर्वजांनी जपलेला वारसा पुढे नेल्याची जाणीव असते. आज आम्ही गणेशाची पूजा आणि आराधना पारंपरिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर काळानुसार सजावटीमध्ये आधुनिक रोषणाई आणि नवीन साहित्याचा वापर केला जातो. त्यामुळे उत्सवाच्या बाह्य स्वरूपात बदल झाला असला, तरी त्यामागील श्रद्धा आणि परंपरेचा गाभा मात्र तसाच आहे. आमच्या कुटुंबातील गणेशोत्सव हा केवळ काही दिवसांचा उत्सव नसून, पूर्वजांच्या श्रद्धेपासून आजच्या पिढीपर्यंत आणि आजच्या पिढीकडून भविष्यातील पिढीकडे जाणारा भक्तीचा आणि संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे. पूर्वजांनी जपलेली ही परंपरा आज आमच्या हातात आहे आणि पुढील पिढीपर्यंत ती अशीच जपली जावी, हीच आमची इच्छा.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- प्रकाश लक्ष्मण आदवडे
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1552 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6be25097a7ef3348b9499d77b970c5c090fd90f1897a640910f033005ed61198
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


