bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01396
माझा बाप्पा: श्रीमंत दगडूशेठ हलवाई

माझा बाप्पा: श्रीमंत दगडूशेठ हलवाई मी बडनेरा येथे राहत होतो. माझे वडील पोलीस विभागात कार्यरत होते. बडनेऱ्यापासून अमरावती साधारण दहा किलोमीटर अंतरावर होती. पोलीस खात्यातील नोकरी म्हणजे कर्तव्याला वेळेची मर्यादा नसते. विशेषतः सण-उत्सव आले की घरापेक्षा कर्तव्य मोठे असते. गणपती असो, नवरात्र असो, दसरा असो किंवा दिवाळी… इतर मुलांप्रमाणे आई-वडिलांसोबत सण साजरे करावेत, गणेश मंडळात जावे, उत्सवाचा आनंद घ्यावा, अशी माझीही मनापासून इच्छा असायची. पण बाबांचा व्यस्त ड्युटी शेड्यूल पाहता आम्हाला ते शक्य होत नसे. आमच्या पोलीस कॉलनीमध्ये गणपती बसवला जायचा. मी त्या बाप्पाच्या आरतीत, सजावटीत आणि उत्सवात रमायचो… पण मनाच्या एका कोपऱ्यात मात्र एक छोटीशी इच्छा कायम होती— “आपल्या स्वतःच्या घरी आपला बाप्पा असावा… आणि तोही माझ्या मनातला बाप्पा!” मला लहानपणापासून सर्वाधिक आवडणारी गणेशमूर्ती म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे. त्या सुंदर, तेजस्वी रूपाने मला अक्षरशः भुरळ घातली होती. पण ती केवळ इच्छा होती… कारण परिस्थिती तशी नव्हती. आणि मग एक दिवस… काहीतरी अद्भुत घडलं! एके दिवशी मी बडनेरा मार्केट परिसरातून सायकलवरून ट्युशनला जात होतो. अचानक रस्त्याच्या कडेला मला काहीतरी चमकल्यासारखे दिसले. कुतूहल म्हणून मी सायकल थांबवली. सायकल बाजूला लावली आणि ते नेमकं काय आहे, हे पाहण्यासाठी खाली वाकलो… आणि क्षणभर माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना! समोर पितळेची एक छोटीशी, साधारण सहा इंचांची गणेशमूर्ती होती. मी ती हातात घेतली… आणि पुढच्याच क्षणी माझ्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची होती! ज्याचे रूप मी लहानपणापासून मनात जपले होते… ज्या बाप्पाला आपल्या घरी बसवण्याची माझी इच्छा होती… तोच बाप्पा अचानक मला रस्त्यात सापडला होता! तो क्षण आजही माझ्या डोळ्यांसमोर तसाच आहे. माझा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. त्या क्षणी माझ्या बालमनाला एकच गोष्ट जाणवली— कदाचित हा केवळ योगायोग नव्हता… ही माझ्या श्रद्धेला मिळालेली बाप्पाची एक छोटीशी पावती होती. जणू बाप्पा स्वतःच सांगत होता— “तुझी इच्छा मला माहीत आहे… तुझी श्रद्धा मला दिसते आहे… आता वेळ आली की मी स्वतः तुझ्या घरी येईन.” त्या दिवसापासून माझ्या मनात बाप्पाबद्दलची श्रद्धा आणखी घट्ट झाली. गणपती बाप्पा मोरया, -डॉ रोहन राठोड
- Kind
- Story
- Place
- Amravati
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1406 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashae35625faa29d85dcab6829e7f4301495741b563636537a0baf2113e33ca62ef
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


