bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01164
माझा गणपती

"बाबा यावेळी गणपतीची मूर्ती थोडी मोठी आणूया का ? मी धरायला मदत करेन" या चिरंजीवांच्या वाक्याने घरातून बाहेर पडताना विषयाला सुरुवात झाली. "अहो, खरंच चतुर्थी पंधरा दिवसावर आली, मूर्ती सांगायला हवी" सौभाग्यवतींने आठवण करून दिली. "नवीन प्रकारची मखरही पहायला हवी" कन्येने चर्चेत सहभाग नोंदवला. "बघुया, उद्या रविवार आहे सुट्टी आहेच तर उद्या सर्वांनी एकत्र बसून चर्चा करून ठरवू सारं काही." म्हणत रोजच्या प्रमाणे कामाला जाण्यासाठी बाहेर पडलो. गाडीचं दार उघडलं सिटवर बसून गाडी सुरू करण्यापूर्वी नेहमीच्या सवयी प्रमाणे गाडीतल्या आईने आणलेल्या गणपतीच्या तसबीरीला नमस्कार करून नेहमीच्या रस्त्यावरून गाडी चालवत जाऊ लागलो. आज एक गोष्ट निश्चित होती, जाताना एकच विचार मनात रेंगाळत रहाणार बाप्पांचा. आजही एकविसाव्या शतकामध्ये आता वैज्ञानिक जगतात इतकी क्रांती होत असतानाही आपण सारे आपली परंपरा व रीतीरीवाज सांभाळत वर्षेभरात किती सण-उत्सव साजरे करतो? प्रत्येक बारीक गोष्टीमागचा वैज्ञानिक पाठपुरावा पडताळून पहात असताना निर्जिव, निर्गुण व निराकार त्या मूर्तीच्या निर्मिती समोर किती भाविकतेने नतमस्तक होत असतो ! यामागे नक्की कोणती शक्ती असेल ? खरंच, या सणांमागचा उद्देश काय असू शकेल ! देवाची स्थापना तरी कशासाठी ? फक्त विचारांच चक्र सुरू झालं. माणूस ज्ञानाने व सामर्थ्याने कितीही मोठा झाला, तरी काळ त्याला आपला हिसका दाखवून देतो. म्हणूनच माणूस, देव हि एक आपल्याहून श्रेष्ठ शक्ती आहे असे मानत असावा. मग त्याला जात, धर्म, पंथ यानुसार वेगवेगळी नावं, रंग, रुप आदी देऊन त्यामागे धाऊन सेवाव्रत करु लागला असं वाटतंय. कृतज्ञतेने कोणत्याही व्यक्ती अथवा शक्तीसमोर नतमस्तक होणं, म्हणजे श्रद्धा बाळगून तीची पूजा करणे हि बाब जर मनःशांती देत असेल तर ती गोष्ट आनंदाने करावी. कारण त्या भावनेमागे एक सकारात्मक दृष्टिकोन असतो जो आशेने जगण्याचा मार्ग दाखवतो. अशा अर्थाने आपल्याकडे देवपूजेचा रितीरीवाज सुरू झाला असावा. नित्य नेमाने मी घरातून बाहेर पडताना देवासमोर हात जोडतो तो याच एकमेव हेतूने कि, आपल्याहून कित्येक पटीने श्रेष्ठ अशी एक शक्ती आपल्या आजूबाजूला आहे जिच्या सकारात्मक उर्जेमुळे आपल्या नियोजित कार्यक्रमात यश लाभते.
- Kind
- Story
- Place
- Sindhudurg
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1174 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash757cdd377695c9b5b11eb0009bad2e16e66e503fbb24b432b962f11a4be0ae05
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


