bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01154
भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस गणरायचे आगमन.
तीन पिढ्यांचा वारसा: भाद्रपद प्रतिपदेचे बाप्पा........! भाद्रपद महिना सुरू झाला की आसमंतात एक वेगळाच दरवळ आणि चैतन्य जाणवू लागते. बहुतांश घरांमध्ये गणेशोत्सवाची लगबग चतुर्थीला सुरू होते; परंतु आमच्या घरात मात्र उत्सवाचा प्रारंभ भाद्रपद शुद्ध प्रतिपदेलाच होतो. प्रतिपदेच्या मुहूर्तावर गणरायाचे आगमन आणि विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्याची ही परंपरा आजची नाही, तर गेली तीन पिढ्यांहून अधिक काळ अखंडपणे चालत आलेली एक पवित्र कौटुंबिक प्रथा आहे. आजोबांच्या काळापासून सुरू झालेला हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी न राहता आमच्या घराची ओळख बनला आहे. प्रतिपदेच्या ब्राह्ममुहूर्तावर घरात सुरू होणारी गडबड, रांगोळीने सजलेला उंबरठा, दारावर बांधलेले आंब्याच्या पानांचे तोरण आणि मंद सुवासाची अगरबत्ती संपूर्ण घराला देवघराचे रूप देते. बाप्पाच्या आगमनावेळी वाजणारी टाळा चा जगर आणि "गणपती बाप्पा मोरयाचा" नाद पिढ्यान्पिढ्यांच्या स्मृतींना उजाळा देतो. ही परंपरा केवळ मंत्रोच्चार किंवा पूजाविधींपुरती मर्यादित नाही; ती आमच्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा सुवर्णधागा आहे. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या, माणसांची जीवनशैली बदलली; पण भाद्रपद प्रतिपदेला लाडक्या गणरायाच्या सेवेत रुजू होण्याचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. या दिवशी विधिवत होणारी प्राणप्रतिष्ठापना घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, सुख, समाधान आणि शांती घेऊन येते. तीन पिढ्यांच्या ही हुन अधिक असलेला हा भक्तीमय वारसा पुढे नेणे ही केवळ औपचारिकता नसून, आमच्या पूर्वजांविषयीचा आदर आणि विघ्नहर्त्या चरणी असलेली अढळ श्रद्धा आहे. हा समृद्ध वारसा असाच अविरत आणि भक्तिभावाने पुढच्या पिढ्यांमध्येही प्रवाही राहील, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना🙏.
- Kind
- Tradition
- Place
- Ratnagiri
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- ओंकार जोशी
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1164 in a hash chain of 1,195. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5874fa6b7cc58619c4087266f1b468ba33f731796ec687cfff8193e3a223f455
Chain head22bd7e3f02d78d812ef4e644a914ad53511c8457b42fdb66d2275f75154b9bb2
The chain verifies end to end as of this page load.


