bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00516
गणपती आणी चंद्रांची कथा
एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाला भक्तांनी खूप सारे मोदक आणि मिष्टान्न नैवेद्य म्हणून अर्पण केले. बाप्पाने ते आवडीने खाल्ले, त्यामुळे त्यांचे पोट खूप मोठे झाले होते. रात्रीच्या वेळी गणपती बाप्पा आपल्या लाडक्या उंदरावर (मूषक) स्वार होऊन घरी परतत होते. वाटेत अचानक एका सापाला पाहून उंदीर घाबरला आणि त्याचा तोल गेला. यामुळे गणपती बाप्पा उंदरावरून खाली घसरले. बाप्पा खाली पडल्यामुळे त्यांच्या पोटातील मोदक जमिनीवर सांडले. बाप्पांनी आजूबाजूला पाहिले आणि कोणी पाहत नाही ना हे निश्चित करून ते मोदक गोळा करून परत पोटात भरले आणि पोटाला तो साप पट्ट्यासारखा बांधला. हे सर्व दृश्य आकाशातून चंद्रदेव पाहत होते. चंद्रदेवाला स्वतःच्या रूपाचा, तेजाचा आणि सौंदर्याचा खूप गर्व होता. बाप्पांना असे खाली पडलेले पाहून चंद्रदेवाला हसू आवरले नाही आणि त्याने मोठ्याने हसून बाप्पांची खिल्ली उडवली. चंद्राचा हा अहंकार आणि अनादर पाहून गणपती बाप्पा अत्यंत संतप्त झाले. त्यांनी चंद्राला धडा शिकवण्याचे ठरवले. बाप्पा चंद्राला म्हणाले, "हे चंद्रा, तुला तुझ्या सौंदर्याचा फार माज आहे ना? तू माझ्या रूपाची चेष्टा केलीस. मी तुला शाप देतो की, आजपासून तुझे हे सुंदर रूप नष्ट होईल, तू पूर्णपणे कुरूप आणि काळा पडशील. तसेच, जो कोणी तुझे तोंड पाहील, त्याच्यावर खोटा आळ (कलंक) येईल!"शाप मिळताच चंद्राचे संपूर्ण तेज नष्ट झाले आणि आकाशात अंधार पसरला. चंद्राला आपली मोठी चूक लक्षात आली. त्याचा अहंकार पूर्णपणे गळून पडला. त्याने लगेचच गणपती बाप्पाची मनोभावे क्षमा मागितली. चंद्राला दुःखी पाहून इतर देवांनीही बाप्पाला शाप मागे घेण्याची विनंती केली. बाप्पा दयाळू आहेत, चंद्राचा पश्चात्ताप पाहून त्यांचा राग शांत झाला. ते म्हणाले, "दिलेला शाप पूर्णपणे मागे घेता येणार नाही, पण मी त्याचा प्रभाव कमी करतो. आतापासून तुझे रूप नेहमीच काळे राहणार नाही. महिन्यातून एकदा तुली पूर्ण कला मिळतील (पौर्णिमा) आणि तिथून तुझा आकार हळूहळू कमी होत जाऊन एक दिवस तू पूर्ण गायब असशील (अमावस्या)." परंतु, बाप्पांनी पुढे एक महत्त्वाची अट ठेवली: "माझा हा जन्मदिवस म्हणजेच गणेश चतुर्थी. या दिवशी जर कोणी तुझे दर्शन घेतले, तर त्याला खोटा आळ किंवा कलंक लागेल."
- Kind
- Story
- Place
- Akola
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #526 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1e51ec6f2c29a86b7d91059091dade160495ce1b9a6dc18b5e993112b3c0d91b
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


