bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00148
आमच्या घरातील बाप्पा..

बालपणापासून मनात रुजलेली बाप्पाची ओढ... बालपणाच्या त्या दिवसांची आठवण आजही मनात ताजी आहे. आम्ही ज्या गल्लीत राहत होतो, तिथे दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणपती बाप्पाची स्थापना केली जायची. गणेशोत्सव सुरू झाला की संपूर्ण गल्ली भक्ती, उत्साह आणि आनंदाने भरून जायची. लहानपणीच्या त्या वातावरणाने मनावर अशी काही छाप पाडली की, नकळत गणपती बाप्पाशी एक वेगळेच नाते जोडले गेले. बाप्पाची आरती असो किंवा मंडळाकडून आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम, त्यात सहभागी होण्याची नेहमीच उत्सुकता असायची. दहीहंडी, संगीत खुर्ची, नृत्य तसेच विविध भक्तिमय कार्यक्रमांमध्ये बालपणीचा उत्साह मनापासून अनुभवायला मिळायचा. त्या दिवसांत गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणे, आरतीच्या वेळी उपस्थित राहणे आणि उत्सवाचा प्रत्येक क्षण अनुभवणे, हेच जणू आनंदाचे पर्व असायचे. याच काळात मनात एक इच्छा हळूहळू रुजत गेली आपल्या घरीही गणपती बाप्पा विराजमान व्हावा. ही इच्छा इतकी मनापासून होती की, घरातील रठ कुटुंबीयांकडे वारंवार घरी गणपतीची स्थापना करण्याचा आग्रह करायचो. बालपण सरत गेले, वर्षे पुढे जात राहिली; मात्र मनातली बाप्पाला घरी आणण्याची इच्छा कायम राहिली. अखेर माझ्या बालपणापासूनच्या या इच्छेला २०१८ मध्ये कुटुंबाची साथ मिळाली. सर्वांच्या संमतीने त्या वर्षी प्रथमच आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना झाली. तो क्षण केवळ गणपतीच्या आगमनाचा नव्हता, तर बालपणी मनात जपलेल्या एका छोट्याशा स्वप्नाच्या पूर्ततेचा होता. २०१८ पासून आजतागायत दरवर्षी बाप्पाचे आगमन घरात तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने केले जाते. बालपणी सार्वजनिक मंडळात सुरू झालेली बाप्पाची ओढ आज घरच्या गणरायाच्या भक्तीत रूपांतरित झाली आहे. प्रत्येक वर्षी बाप्पाच्या आगमनासोबत घरात आनंद, भक्ती आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते. बालपणात मनात रुजलेली ही श्रद्धा आजही तितकीच जिवंत आहे... गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! _ सचिन वामन जिवतोडे पत्ता : सर्वोदय वॉर्ड क्रमांक ३ आरमोरी रोड गडचिरोली. ४४२६०५
- Kind
- Story
- Place
- गडचिरोली
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #154 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe8683d58a3a2a78d03b19d358055ea9e7c331e23cf5ddf99741ed88dc085bc34
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


