bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00097
मूर्तिकार खातू कुटुंबाची ८० वर्षांची परंपरा

१५ ऑगस्ट १९४७ रोजी माझ्या आजोबांनी म्हणजे रामकृष्ण खातू यांनी गणेशमूर्ती घडवून विक्री करण्यास सुरवात केली. तो काळ वेलिंग मास्तर , सारंग बंधू, कांबळी , झाड अशा मूर्तिकारांचा घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव गणेशमूर्ती व्यवसायात यशस्वी असण्याचा काळ होता. पूर्णत: अनाथ पार्श्वभूमीवर केवळ स्वत:च्या कलेसाठी आजोबांनी मातीचे प्राणी व खेळणी बनवता बनवता हा व्यवसाय सुरू केला. त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले ते त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विजय खातू यांच्या काळात. जेजे स्कूल ऑफ आर्ट्स पासून सुरूवात करून पुढे आपल्या भावांच्या मदतीने त्यांनी हा व्यवसाय वृद्धिंगत केला. उदय खातू या व्यवसायात प्रशासन व व्यवहार सांभाळत तर राजन खातू उत्पादन वितरणाचे नियोजन करत. कलेचा संपूर्ण भाग व प्रसिद्धी विजय खातू स्वत: सांभाळत. मूळ गावातील खातू कुटुंबिय मदतीसाठी असायचेच. उंच मूर्तींची परंपरा विजयकाकांचे गुरू वेलिंग मास्तरांनी सुरू केली असली तरी त्याला व्यावसायिक स्वरूप दिले ते काकांनीच. आजचे विविध गणसंकुलांमध्ये कार्यरत असणारे सर्व मूर्तिकार कधी ना कधी शरद आर्ट्स या खातूंच्या कारखान्यात शिकून गेलेले आहेत. अखंड गणसंकुल एकत्रित केवळ खातू बंधूंचे गणपती बनायचे. उत्सवी अर्थकारण म्हणजे फेस्टिव्हल इकॉनमी ला सुरुवात याच काळात झाली. पहिल्यांदा अमेरिकेच्या महाराष्ट्र मंडळात महाराष्ट्र शासनामार्फत गणेशोत्सवानिमित्त शोभायात्रा निघाली ती यांच्याच उपस्थितीत. आज विजय व राजन या दोन्ही काकांच्या पश्चात त्यांची मुले हा व्यवसाय स्वतंत्रपणे सांभाळत आहेत. रेश्मा विजय खातू आघाडीची महिला मूर्तिकार असून निखिल राजन खातू त्याच्या अत्यंत गोंडस चेहऱ्याच्या खळीवाला बाप्पा या उंच व सुबक मूर्त्यांकरिता प्रसिद्ध आहे. तर माझे बाबा उदय खातू आजही सर्वात ज्येष्ठ मूर्तिकार म्हणून वयाच्या सत्तरीत कार्यरत आहेत. नुकताच महाराष्ट्र शासनाने मूर्तिकारांच्या सन्मानार्थ वेलिंग खातू पुरस्कार जाहीर करून त्यांना सन्मानित केले आहे तसेच कलेच्या क्षेत्रात गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करून कुटुंबाच्या परंपरेच्या व्याख्येत सर्व तरुण मूर्तिकारांना आशेचा किरण मिळवून दिला. याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार.
- Kind
- Story
- Place
- लालबाग मुंबई
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #103 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashcc48eb00419336d0b142ec54a6b222c5e029aab1e502e90360ea0a6fa3eae153
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


